* कोपरीतील लाभार्थी १७ वर्षांनी चिंतामुक्त
* उर्वरित रक्कम १२ हप्त्यांत देण्याची मुभा
ठाणे : अखेर १७ वर्षांनी कोपरीतील बीएसयूपी योजनेतील लाभार्थी रहिवाशांना २०,७०० रुपये भरून घराचा ताबा देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम १२ हप्त्यांत अदा करण्याची सोय असून ती रक्कमही भरण्यात असमर्थता दर्शवली तर ती रक्कम मालमत्ता करात वर्ग करण्यात येणार आहे.
कोपरी येथील बीएसयूपी योजनेत आर्थिक अडचणीमुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थींचे अखेर घराचे स्वप्न साकार होणार आहे. या घरांसाठी निश्चित केलेली रक्कम महापालिकेकडे १२ हप्त्यात भरण्याची मुभा ठाणे महापालिकेने दिल्याने आता अवघे २० हजार ७०० रुपये भरून घरांचा ताबा मिळणार आहे. या निर्णयाने `बीएसयूपी’च्या लाभार्थींच्या १७ वर्षांच्या लढ्याला यश आले असून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
केंद्र सरकारच्या `जेएनएनयूआरएम’ प्रकल्पांतर्गत बाधित कुटुंबाचे शहरात ठिकठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. परंतु, कोपरीत विविध कारणांमुळे अनेक झोपडीवासियांना अपात्र ठरविण्यात आले होते. या झोपडीवासियांना घराचा हक्क मिळवून देण्यासाठी २००७ पासून माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. यासदंर्भात अनेक आंदोलने करण्यात आली. त्यानंतर ३ मार्च २०२२ रोजी झालेल्या महासभेतील ठरावानुसार अपात्र लाभार्थींना घरे मंजूर झाली. २२ जून २०२३ रोजी लाभार्थींना सदनिकांचे क्रमांक वितरीत करण्यात आले. परंतु, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थींना घर मोफत देऊ नये, ही अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार रेडीरेकनरनुसार सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या २५ टक्के रक्कम शुल्क म्हणून आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
लाभार्थींमध्ये हातावर पोट भरणार्या लाभार्थी कुटुंबांची संख्या लक्षणीय होती. बहुजन समाजातील या कुटुंबांना तब्बल दोन लाख सात हजार रुपयांची रक्कम एकरकमी भरणे अशक्य होते. त्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी लाभार्थींना टप्प्या-टप्प्याने लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी मंजुरी दिली. तसेच २०,७०० रुपये भरून सदनिकेचा ताबा द्यावा. त्यानंतर उर्वरित रक्कम पुढील १२ महिन्यांत समान हप्त्याने भरण्याची सवलत द्यावी. १२ महिन्यांच्या समान हप्त्यात लाभार्थींना रक्कम भरता न आल्यास सदनिकेच्या मालमत्ता करामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.