ठाणे: ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी ७ ते ९ जून या कालावधीत आयोजित केलेले महाअधिवेशन व प्रदर्शन आचारसंहितेच्या कारणास्तव पुढे ढकलले आहे, अशी माहिती आयोजक तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.
गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासात विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी ७ ते ९ जून या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकुलीत मंडपात “गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन” व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, सहकार मंत्री गृहनिर्माण मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच, सहकार विभागाचे प्रधान सचिव आणि सहकार आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे सदरचे अधिवेशन व प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या महाअधिवेशनाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांनी याची नोंद घ्यावी. त्याचबरोबर ज्या संस्थांनी अधिवेशनासाठी नोंदणी केली नसेल त्या संस्थांनी या कालावधीत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी केले आहे.