गावदेवी भूमिगत पार्किंग पूर्णत्वाकडे

* २६० वाहनांची क्षमता
* लिफ्ट, अग्निशमन परवानगीची प्रतीक्षा

ठाणे : ठाणे स्टेशन परिसरातील पार्किंग समस्येवर मात करण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत बांधण्यात येत असलेली गावदेवी भूमिगत पार्किंग व्यवस्था आता पूर्णत्वाकडे येत असून लवकरच ही सुविधा ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.

पार्किंग सुविधा, लिफ्ट सुविधा आदींची पाहणी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी नुकतीच केली. तेथील लिफ्ट सुविधेची चाचणी माळवी यांनी त्यांच्या वाहनासह घेतली.

गावदेवी भूमिगत पार्किंग येथे १३० चारचाकी आणि १३० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गावदेवी भूमिगत पार्किंगचे काम सुरू आहे. सध्या मैदान पूर्ववत करण्यात येत असून ते काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल.

अग्निशमन यंत्रणा, रंगरंगोटी ही कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत, असे निर्देश संदीप माळवी यांनी दिले आहेत. तसेच, राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लिफ्ट संबंधित तपासणी परवानगी तसेच उर्वरित कामे पुढील १५ दिवसात पूर्ण करावीत असेही माळवी यांनी स्पष्ट केले. या पाहणीच्या वेळी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पाफळकर, कार्यकारी अभियंता विकास ढोले आदी अधिकारी उपस्थित होते.