गावदेवीच्या सफाई कामगारांना २७ वर्षांनी मिळाली हक्काची घरे

आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा

ठाणे : गेली २७ वर्षे गावदेवी येथील सफाई कामगार हक्काच्या घरासाठी लढत होते, प्रशासनाचे उंबरे झिजवत होते. आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रहिवाशांना हक्काची घरे मिळाली असून त्यांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या. यावेळी रहिवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

गावदेवी येथे सफाई कामगारांची वसाहत होती. तीन माळ्याच्या तीन इमारती होत्या. या इमारतीत सफाई कामगारांची 72 कुटुंबे राहात होती. इमारती धोकादायक झाल्याने 1995 मध्ये महापलिकेकडून इमारती पाडण्यात आल्या. 18 महिन्यात पुन्हा याच ठिकाणी इमारती बांधून खोल्यांचे मालकी हक्क कामगारांना देणार असे सफाई कामगारांना करारनाम्याद्वारे आश्वासित करण्यात आले होते.

या आश्वासनानंतरही कामगारांना हक्काची घरे मिळाली नाहीत. सफाई कामगार भगवान बारिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणही केले, परंतु आश्वासनाव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. याबाबत श्री. बारिया यांनी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. आ. केळकर यांनी तत्काळ या विषयाबाबत महापालिका अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला. ठामपा आयुक्तांशी वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर 35 घरांसाठी लॉटऱ्या काढण्यात आल्या. यावेळी सफाई कामगारांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. २७ वर्षात कोणी केले नाही ते केवळ एक वर्षाच्या आत आ. केळकर यांनी आमच्यासाठी केले, अशी भावना सफाई कामगारांनी बोलताना व्यक्त केली. यापूर्वीही आ. केळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेच्या माध्यमातून 56 सफाई कामगार कुटुंबांना व शेकडो बेघरांना कायमस्वरूपी घरे मिळवून दिली आहेत. यावेळी आमदार केळकर यांचे सर्व सफाई कामगारांनी आभार व्यक्त करून त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.