अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील रासायनिक कंपनीत वायूगळती झाल्याने गुरुवारी रात्री उशिरा मोरिवली आणि बी केबिन रस्ता परिसरासह आसपासच्या भागातील नागरिकांना घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे आणि श्वास घेण्याचा त्रास जाणवला.
अंबरनाथच्या मोरीवली औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक ४३ वर निकाकेम प्रॉडक्ट्स या कंपनीत रासायनिक उत्पादन केले जाते. गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास या कंपनीतून अचानक रासायनिक धूर शहरात पसरला. यामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांना डोळे चुरचरणे, घसा खवखवणे त्याचप्रमाणे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. परिसरात मोठ्या प्रमाणात वायू पसरला होता. हिवाळ्यात धुके पडावे तसा वायू पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेचे वृत्त समजताच अंबरनाथ नगरपालिका आणि एमआयडीसीचे अग्निशमन दल दाखल झाले.
दिवसा काम सुरू असलेल्या निकाकेम कंपनीत रासायनिक पदार्थ असलेल्या ड्रममध्ये पावसाच्या पाण्याचा संपर्क आल्याने त्यातून वाफा आणि धूर निघाल्याने तो धूर पसरला, अशी माहिती अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांनी दिली.
शहरात गौरी-गणपती विसर्जन असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले होते. त्याचवेळी रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी घराची दारे- खिडक्या बंद ठेवल्या होत्या.
दरम्यान वायू गळतीचे वृत्त समजताच आज आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मोरिवली एमआयडीसी भागातील कंपन्यांची पाहणी केली. तसेच गॅसगळती झाली कंपनीचा देखील त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आढावा घेतला होता. कंपन्या बंद करण्याच्या नोटिसा दिलेल्या असताना देखील पुन्हा त्या कंपन्या सुरू झाल्या कशा असा जाब विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गलथान कारभारामुळेच अंबरनाथकरांचा जीव गुदमरत असल्याचा आरोप आमदार डॉ. किणीकर यांनी केला.
या कंपनीत 10 ते 12 कामगार असून गुरूवारी एका अप्रशिक्षित कामगाराने रसायन एका ड्रममधून दुसऱ्या ड्रममध्ये ओतले. मात्र त्यानंतर त्या रसायनांवर झाकण न लावताच कामगार गणपती विसर्जनासाठी निघून गेला. दरम्यान कंपनीच्या आवारात उघड्यावर ठेवलेल्या आठ ड्रममधील रसायनांचा साठा हवा आणि पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने सर्वत्र गॅस गळती सुरू झाल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गॅस गळतीच्यावेळी कंपनीच्या मागील बाजूस काही ड्रममध्ये रसायनांचा साठा जाळला असल्याची तक्रार काही स्थानिक नागरीकांनी केली आहे.
या प्रकऱणी आज शुक्रवारी एमपीसीबीने कंपनीला काम बंदचे आदेश देण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. यासोबत कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राजेंद्र रजपुत यांनी दिली आहे.