घोलाई नगरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट – सहा घरांचे नुकसान

ठाणे : कळवा घोलाई नगर येथील गगनगिरी चाळीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची तर, एक गॅस सिलेंडर लिकेज झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून सहा घरांचे नुकसान झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

कळवा येथील पारधी पाडा, गणेश वेल्फेअर सोसायटी, घोलाई नगर, कळवा (पु.), ठाणे येथे गगनगिरी चाळीमध्ये गुरुवारी संध्याकाळी ४.३५ च्या सुमारास २-गॅस सिलिंडरचा स्फोट आणि १ गॅस सिलिंडरची गळती होऊन आग लागली होती. या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्या सोबत कळवा पोलीस, वन विभागाचे कर्मचारी, टोरेंट विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान, १-फायर इंजिन, १-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, कोणलाही दुखापत झाली नाही. तर गगनगिरी चाळीतील या सहा झोपडपट्टी खोल्यांचे पूर्ण नुकसान झाले असून राम उजागीर मोरया, रघुनंदन मोरया, हरिश्चंद्र कनोजिया, राजेंद्र बुरुड, कालू गुप्ता, राहुल गुप्ता अशी नुकसान झालेल्या घरमालकांची नावे असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.