कचरा कोंडी फुटणार; डायघर प्रकल्प पुन्हा सुरु?

४५० मॅट्रिक टन कचरा शहरात येणार नाही

ठाणे : डायघर प्रकल्प आता पुन्हा सुरु करण्यात आल्याचे बोलले जात असून त्यामुळे सुमारे ४५० मॅट्रिक टन कचरा शहरात न येता थेट डायघरला जाणार आहे. परिणामी येत्या दहा दिवसांत शहराची कचरा कोंडी फुटणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेत सत्ताधारी पक्षाची वचनपूर्ती म्हणून दिवा डम्पिंग ग्राऊंड यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. सीपी तलाव येथे कचरा टाकण्याची क्षमता संपली आहे. याशिवाय डायघर प्रकल्पालाही नागरिकांचा विरोध असून या ठिकाणी देखील पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने शहरातील कचरा नियोजनाचे पूर्णपणे तीनतेरा वाजले होते. मे महिन्यांत तर डायघर प्रकल्प केवळ १० दिवसच सुरु होता. परिणामी कळवा, मुंब्रा आणि दिव्याचा ४५० मॅट्रिक टन कचरा थेट ठाण्यातील सीपी तलाव या ठिकाणी आणण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र सीपी टॅंकचीही क्षमता संपल्याने कचरा टाकायचा कुठे असा मोठा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे काही दिवस शहरात कचऱ्याची कोंडी झाल्याने ठीकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते.

मात्र आता पालिका प्रशासनाच्या वतीने प्रभावी उपाययोजना राबवणे सुरु केले असून येत्या दहा दिवसांत शहरातील कचरा कोंडी फोडण्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. डायघर प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात आल्याने कळवा, मुंब्रा आणि दिव्याचा कचरा शहरात येणार नसल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले आहे. यामुळे ८० ते ९० फेऱ्या कमी होणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त जेसीबी आणि घंटागाड्या कामाला लावण्यात आल्या आहेत. येत्या दहा दिवसांत हा साचलेला कचरा साफ होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कचऱ्याचा प्रश्न १० दिवसांत सोडवला जाईल. डायघर प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात आल्याने ४५० मॅट्रिक टन कचरा आता सीपी टॅंक या ठिकाणी येणार नाही. याशिवाय शहरात साचलेला कचरा देखील उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तातडीने सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.