कचराकोंडी: कंत्राटी कामगारांचा अंबरनाथ पालिकेत ठिय्या

अंबरनाथ: गेल्या चार दिवसांपासून शहरात निर्माण झालेल्या कचरा कोंडीतून अंबरनाथची मुक्तता झाली नाही. वेतन न दिल्याने काम बंद केलेल्या कंत्राटी कामगारांनी आज नगरपालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत निदर्शने केली.

शहरात आजही जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आढळून आले. शहरात जमा होणारा दैनंदिन कचरा उचलण्यासाठी ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने शुक्रवारपासून कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. आज सोमवार (२४) फेब्रुवारीला या कामगारांनी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

थकीत वेतन त्वरित द्यावे, दर महिन्याचा १५ तारखेच्या आत पगार मिळावा, दिवाळीला ठेकेदाराने बोनस द्यावा, कामगारांना सुरक्षा साधने पुरवावीत, कामगारांना आठवड्याला एक सुट्टी मिळावी या आणि इतर मागण्यांची पूर्तता करावी, सर्व थकीत वेतन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा कंत्राटी कामगारांच्या वतीने देण्यात आला.