ठाण्यातील सी.पी. तलाव डम्पिंग ग्राउंडवरील घटना
ठाणे : वागळे इस्टेट भागातील सी.पी. तलाव येथे जेसीबीखाली येऊन कचरावेचक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. यामुळे पुन्हा एकदा कचरावेचक महिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जयश्री जाधव असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव असून ती वागळे भागातील जयभीम नगर येथे राहत होती. संध्याकाळी ४. ४५च्या दरम्यान सी. पी.तलाव येथिल डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यामधील काच-पत्रा गोळा करत असताना त्या अचानक जेसीबीच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे कचरा वेचक महिलांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
या डम्पिंग ग्राउंडवर संपूर्ण ठाण्यातील कचरा टाकला जातो. या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सुमारे ७० ते ८० कचरावेचक महिला तेथे कार्यरत असून कचरा हटविण्याचे काम जेसीबीमार्फत सुरु असताना या कचरा वेचक महिला तेथे जाऊन कचऱ्यामधील काच-पत्रा, प्लास्टिक आणि इतर टाकाऊ वस्तू शोधून काढत असतात. अशाप्रकारे या महिलांचा अपघात होऊ शकतो, अशी भीती येथिल एका सामाजिक कार्यकर्त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्याकडे यापूर्वीच व्यक्त केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच एका गरीब महिलेचा मृत्यू झाल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कचरावेचक महिलांकडून त्यांच्या जबाबदारीवर ते काम करत असल्याचे लिहून घेतल्याचे त्या कार्यकर्त्याने सांगितले आहे. या प्रकरणी वागळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.