Thanevaibhav Online
18 September 2023
आनंद कांबळे/ठाणे
कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने देशातील स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत ठाणे महापालिकेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे, अन्यथा देशात ठाणे शहर अव्वल असते.
हवेतील प्रदूषण कमी करणाऱ्या देशातील शहरांसाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू विभागाने सर्वेक्षण स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधून ठाणे महापालिकेने १८५.२ गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला आहे. १८६ गुण मिळवून आग्रा दुसऱ्या तर १८७ गुण मिळवून इंदोरने पहिला क्रमांक मिळवला आहे. या सर्वेक्षण स्पर्धेत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांनी काय-काय उपाययोजना राबवल्या त्याची माहिती घेण्यात आली.
ठाणे महापालिकेने हवेतील कार्बन डाय ऑक्साईड कमी करण्यासाठी महापालिकेच्या शाळा, हॉस्पिटल, तसेच कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. प्रत्येक गृहसंकुलाला इमारतीचा आराखडा मंजूर करताना सौर ऊर्जेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यावरील चौकात धूळकण शोषून घेणारी यंत्रे महापालिकेने बसवली आहेत. त्याचबरोबर हवेत धुळकण जाऊ नये यासाठी उड्डाणपुलांच्या खाली पाण्याचे तुषार सोडणे, शहरातील स्मशानभूमीमध्ये गॅस आणि इलेक्ट्रिक शव दाहिन्या लावणे आणि परिवहन सेवेच्या बसेसबरोबर महापालिकेतील काही गाड्यांना गॅस आणि इलेक्ट्रिकचा वापर करून प्रदूषण कमी करण्यात हातभार लावला आहे.
असे प्रयत्न सुरू असताना शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर महापालिका प्रक्रिया करत नाही. हा कचरा डम्पिंग ग्राउंडवर पेटवला जातो, त्यामुळे धूर आणि दुर्गंधी येऊन हवेतील प्रदूषण काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेचे गुण कमी झाले आहेत.
पहिला क्रमांक मिळवलेल्या इंदोर आणि ठाणे महापालिकेच्या गुणात अवघ्या १.८ गुणांचा फरक आहे तर दुसरा नंबर मिळवलेल्या आग्रा आणि ठामपामध्ये फक्त ०.८ गुणांची तफावत आहे. पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवलेली शहरे कचऱ्यावर प्रक्रिया करतात, त्यामुळे त्यांचे गुण वाढले आहेत. पुढील वर्षापासून ठामपा देखिल कचऱ्यावर प्रक्रिया सुरु करणार असल्याने ठाण्याचा देखिल पहिला क्रमांक येईल, असा विश्वास ठामपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांत अमरावती शहर पहिले, मुरादाबाद दुसरे आणि गुंटूर तिसरे तर तीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये परवानू पहिले, कळंब दुसरे आणि अंगुळ या शहराने तिसरा क्रमांक पटकावला आहे.