ठाणे : कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड यांचाच पहिला दावा असल्याचं राज्याचे मंत्री आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. कल्याण पूर्व या जागेवर शिवसेना शिंदे गटाकडूनही दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य हे महत्त्वाचे मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्याचं दिसत आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याणच्या कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली.
मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, वर्षानुवर्षे या भागामध्ये आमदार गणपत गायकवाड हे काम करतात, सातत्याने निवडून येत आहेत. आपला माणूस असंच त्यांना संबोधलं जातं. त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे गणपत गायकवाड हेच उमेदवार असावे असे वाटत आहे. त्यामुळे या बैठकीला त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणपत गायकवाड हे महायुतीमध्ये आमदार म्हणून आहेत. महायुतीला विधानपरिषदेमध्ये आवश्यकता भासली त्यावेळेस ते त्या ठिकाणी आले होते.
कल्याणच्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रथम भारतीय जनता पार्टीचा दावा आहे. तसे डोंबिवलीमध्ये मी वर्षानुवर्षे निवडून येत आहे. त्या ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत. स्वाभाविकपणे इच्छुक असणे ही काय चूक नाही. परंतु त्या-त्या पक्षाने दावा करणे हे पण योग्यच आहे. प्रत्येकाने काय करावे, त्यांच्या पक्षाने काय करावे, प्रत्येक नेत्याने-कार्यकर्त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा वेगळा आहे, त्यांची वेगळी ओळख आहे. पक्षश्रेष्ठी जसे आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करतो.
कल्याण पूर्वच्या जागेवर भाजपचे गणपत गायकवाड हे निवडून आले आहेत. पण शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी पोलिस स्थानकात गोळीबार केला होता. त्यानंतर ते सध्या तुरुंगात आहेत. कल्याण पूर्वची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिंदे गटाकडूनही प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.