मीरा-भाईंदर पोलिसांची कारवाई
भाईंदर: मीरा-भाईंदर गुन्हे शाखा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत राष्ट्रीय पातळीवर ट्रक चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल सात कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी वाहने चोरी करून परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतले आरोपी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाड्या अस्तित्वात नसताना अरुणाचल प्रदेश, नागालँड व इतर राज्यातील विविध आरटीओ कार्यालयामध्ये गाड्यांचे रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन नंबर व इतर कागदपत्रे प्राप्त करत होते.
त्या कागदपत्रांच्या आधारे सदर चोरी केलेली वाहने महाराष्ट्र राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन कारवाईची असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कार्यालयातून एनओसी प्राप्त करून विक्री करत असल्याचे समोर आले आहे. १५ फेब्रुवारी रोजी काशीमिरा पोलीस ठाण्यात ट्रक चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
यानंतर पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) यांनी काशीमिरा गुन्हे शाखा-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविराज कुराडे यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवली. गुन्हे शाखा एकच्या टीमने दिवस-रात्र तपास करत अजहर अकबर शेख, समीर नासीर खान राहणार छत्रपती संभाजी नगर, मोहम्मद शकील शाह राहणार अमरावती, शेख नासीर शहजादमिया राहणार नांदेड यांना अटक केली.
दरम्यान, हे सर्व आरोपी गॅरेज आणि गाड्यांची खरेदी विक्रीचे काम करत असून चोरीच्या गाड्या देखील विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींवर एकूण १६ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये एक गुन्हा राजस्थान आणि उत्तरप्रदेशमध्ये दाखल आहे. या आरोपींकडून चोरीची एकूण ४७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.