गायमुख घाट रस्त्याच्या कामाला अखेर गती

४० कामगार रात्रंदिवस काम करणार

ठाणे: मजबुतीकरण केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच उखडलेल्या गायमुख घाट रस्त्याच्या कामाला अखेर वेग आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामाला गती देण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गायमुख घाट रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम दीड महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून हे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या कामांसाठी ७ जूनपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मात्र अवघ्या दीड महिन्यातच हा रस्ता पुन्हा खराब झाला असून यापूर्वी केलेल्या कामाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. दरम्यान रविवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली असून गायमुख मार्गावर घाट रस्त्याचे कामही युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.

घोडबंदर मार्गावरील गायमुख परिसरात भयंकर परिस्थिती असून खड्डेमय प्रवासाने वाहनचालकांसह प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २७ मे रोजी गायमुख घाटाच्या सातशे मीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेत साई सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन या खाजगी कंपनीच्या कंत्राटदाराला वार्षिक दुरुस्ती खर्चातून काम देण्यात आले. मात्र या ठेकेदाराने रस्ता करतो असे सांगून अक्षरश: फसवणूक केली होती.

या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला मास्टिक पद्धतीने खड्डे बुजविण्यात येत आहेत. जवळपास ४० हून अधिक कामगार यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत. ४८ तासांत या मार्गावर खड्डे आणि रस्त्याला पडलेली चर बुजविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.