जि.प. शाळा ते इस्रोत शास्त्रज्ञ; शिरगावच्या सुजाताची गरुडझेप

शहापूर: ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील शिरगांव या लहानशा गावातील सुजाताची गरुडझेप ठाणे जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनला आहे.सुजाता मडके हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सुजाताच्या संशोधनातून ठाणे जिल्ह्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बेंगलुर, कर्नाटक येथे शास्रज्ञ (राजपत्रित अधिकारी) या पदावर सुजाता रुजू झाली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिरगांव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या सुजाताचा प्रवास प्रेरणादायी आहे. सुजाताने शहापूर येथील ग. वि.खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन नंतर तिने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) खरगपूर येथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमांतर्गत व्हर्च्युअल लॅब प्रोजेक्ट -३ मध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेत वरिष्ठ लिपिक पदावर काम करणारे रामचंद्र मडके आणि गृहिणी असलेल्या आई सविता या दाम्पत्याने आपली भूमिका चोख पार पाडली. यापुर्वी सुजाताची सहाय्यक अभियंता म्हणून ‘महाजेन्को’मध्ये निवड झालेली होती. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये सायंटिस्ट-बी पदाच्या मुलाखतीपर्यंत आणि भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), ट्रॉम्बेच्या टेक्निकल ऑफिसर पदाच्या मुलाखतीपर्यंत तिने धडक मारलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करुन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत होती. दरम्यान नुकतेच ती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर (एसओएससी) या पदावर रुजू झालेली असून तिचे पद पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल १० इतक्या उच्च दर्जाचे आहे.

इस्रोच्या वतीने सुजाताला मिळालेल्‍या संधीचा सार्थ अभिमान आहे. तिच्‍या या यशाने आपल्‍या जिल्ह्याचे नाव संशोधन संस्‍थेत पोहचेल ही देखील आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या देशाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये तिच्या हातून मोलाचे कार्य व्हावे आणि तिची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशा शुभेच्छा शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी दिल्या.

मला ईस्रोपर्यंत पोहोचता आले याचा मला आनंद आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे होते. आईवडिल माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी केलेले संस्कार व मार्गदर्शन यामुळेच मला ईस्रोपर्यंत पोहचता आले, असे सुजाता मडके यांनी सांगितले.