आमदार संजय केळकर यांची आयुक्तांशी चर्चा
ठाणे: शहरातील नाले सफाई, शाळा आणि सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती तसेच अनधिकृत बांधकामांची जंत्रीच आमदार संजय केळकर यांनी आज मांडल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.
सध्या आयुक्तांच्या माध्यमातून शहरात शाळा दुरुस्ती, नाले सफाई, रस्ते दुरुस्ती आणि पावसळपूर्व कामे सुरू आहेत. यातील आढळून आलेल्या त्रुटी आज आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांपुढे मांडून तातडीने आवश्यक बदल तसेच कठोर कारवाईची मागणी केली. शाळांमध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू असून ती निकृष्ट दर्जाची असल्याचे श्री.केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली. अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी असून कोणतीही शाळा विना शिक्षक राहू नये, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली.
सार्वजनिक शौचालयांचीही अत्यंत दुरवस्था असून काही ठिकाणी नवीन शौचालयांची गरज असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. शहरातील ८० टक्के शौचालयांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असून आवश्यक तेथे नवीन शौचालयेही बांधण्यात येतील, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. नाले सफाईची कामे सुरू असून अनेक ठिकाणी ती योग्य होत नसल्याचेही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. आम्ही याबाबत आयुक्तांना वेळोवेळी कळवत असून नागरिकांनीही याबाबत आम्हाला कळवावे, असे आवाहनही श्री.केळकर यांनी केले.
शहरात अनधिकृत बांधकामांची समस्या कायम असून भूमाफिया आणि तथाकथित बिल्डरांवर प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे सांगून आमदार केळकर यांनी आयुक्तांपुढे अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरू असल्याचे सांगितले. यावर आयुक्तांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले.
दत्तक नाला योजना संकल्पनेची प्रशंसा
आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेनुसार आणि जागर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात दत्तक नाला योजना आकारास येत आहे. या प्रायोगिक उपक्रमास प्रतिसाद मिळाला तर शहरात नाले सफाईच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. या उपक्रमाबाबत आयुक्त अभिजित बांगर यांनी श्री.केळकर यांचे आभार मानले.