ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन व डिग्निटी फाउंडेशनच्या सहकार्याने ठाणे शहरातील गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी (वय ६०+ ) मोफत रोटरी फिजिओथेरपी व्हॅनचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.
प्रमुख पाहुणे-रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे गव्हर्नर डॉ. मयुरेश वारके, अतिथी- माजी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे गव्हर्नर डॉ. संदीप कदम, ठामपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊनचे अध्यक्ष दीपक पांडे, माजी अध्यक्ष अशोक सिंग आदींच्या हस्ते विद्या प्रसारक कॉलेज बाळकुम, ठाणे येथे उत्साहात झाला.
आज ज्येष्ठ नागरिकांना फिजिओथेरपीची गरज आहे फिजिओथेरपी तुमच्या शरीराला मजबूत आणि अधिक लवचिक बनण्यास मदत करते. जसे वय वाढत जाते तसे वृद्धांमध्ये शारीरिक बदल घडत असतात. शरीरातील हाडे आणि स्नायूची झीज होत असते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि स्नायूची ताकत कमी होते, शरीराचं संतुलन बिघडते. अलिकडे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य फिट ठेवण्याची गरज असूनही दैनंदिन आयुष्यातील आर्थिक अव्यवस्थेमुळे, वाहन सुविधा नसल्यामुळे आरोग्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच इच्छा असूनही काही ज्येष्ठ नागरीकांची पावले हॉस्पिटलकडे वळत नाहीत. ज्येष्ठांसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी हल्ली लोकांकडे फारसा वेळच नाही. ज्येष्ठांची ही समस्या रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन च्या लक्षात आली.
रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाउन व डिग्निटी फाउंडेशनच्या सहकार्याने मोफत फिजिओथेरपी व्हॅन ज्येष्ठ नागरिकांच्या दारी या उपक्रमाने ती समस्याही सोडवून आरोग्याची सेवा सर्वदूर नेण्यात हातभार लावला. रोटरीने ठाण्यात २०२२मध्ये या मोफत फिजिओथेरपी व्हॅनचे ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी उपक्रमांतर्गत पहिले फिरते आरोग्य केंद्र सुरू केले. यामुळे गरजू ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या विभागात फिजिओथेरपी व्हॅन उपलब्ध होऊ शकेल, असे यावेळी रोटरीतर्फे आपले विचार रोटरीचे डॉ. मयुरेश वारके, डॉ. संदीप कदम, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, रोटरी अध्यक्ष दीपक पांडे,अशोक सिंग आदीनी मांडले .
रोटरी फिजिओथेरपी व्हॅन ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी या योजनेला सहकार्य करणाऱ्या अन्य रोटरी क्लब जसे रोटरी क्लब ऑफ ठाणे, ठाणे वेस्ट, ठाणे लेकसिटी, ठाणे
मिडटाऊन, ठाणे डाउनटाउन, ठाणे ग्रीनस्पान, ठाणे नॉर्थ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अनेक सदस्य ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे मान्यवर, बाळकुम परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
ठाणे शहरात प्रभाग-प्रभागात सोसायटी-सोसायटीत कॅम्प भरवून जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी ठाणे अपटाऊनच्या ज्योती चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी सदस्या माधवी खरोटे व अस्मिता पाटील यांनी केले.