सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनाही विनामूल्य जेवण

दररोज ३५० नातेवाईकांना अन्नसेवेचा लाभ

ठाणे: ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसह आता रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोयही आता करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना कठीण काळात रूग्णालय प्रशासनाचा आधार वाटू लागला असून, दररोज ३०० ते ३५० नातेवाईक या मोफत अन्नसेवेने तृप्त होत आहेत.

रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना सोबत येणाऱ्या त्याच्या नातेवाईक मित्रमंडळींची जेवणाची चांगलीच तारांबळ उडते. अनेकवेळा रस्त्यावर वडापाव, चहा-बिस्कीट खाण्याची स्थिती असते. परंतु सिव्हील रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय केली आहे. एकाच वेळी साडेतीनशे व्यक्ती सकस जेवणाचा स्वाद घेताना दिसतात.

वागळे इस्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हील रुग्णालयात दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागातून, पालघर जिल्ह्यातून हे रुग्ण येत असतात. रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यांनतर सोबतीला आलेल्या नातेवाईकांवर चांगलाच ताण येतो. रुग्णाच्या चिंतेने ग्रासलेल्या नातेवाईकाच्या जेवणाचीही तारांबळ उडते. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय चैतन्य आणि समतोल फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जेवण उपलब्ध केले आहे. दुपारी आणि रात्रीच्या जेवणात वरण, भात, भाजी आदी प्रकार असून, एकाच सत्रात ३५० व्यक्ती जेवणाचा लाभ घेताना दिसतात. जेवणाच्या सोयीमुळे मोठा आधार मिळाला असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात.