१७ लाख नागरिकांना डोस देणार
ठाणे : केंद्र सरकारकडून कोविड लस अमृत महोत्सव अंतर्गत पुढील ७५ दिवस बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ३२ आरोग्य केंद्रावर ही मोहीम सुरु केली आहे.
आतापर्यंत ९७,५३६ नागरीकांनी बुस्टर डोस घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तर बुस्टर डोस घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी महापालिकेच्या कॉल सेंटरमधून ठाणेकरांना आता त्यासाठी कॉलही जाऊ लागले आहेत. १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस देण्यास १५ जुलैपासून सुरवात झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या ३२ आरोग्य केंद्रातून कोव्हॅक्सीन आणि कोवीशिल्ड डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या त्या प्रभागात कॅम्पही आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार तीन दिवसात १४ ठिकाणी कॅम्प घेण्यात आले आहेत. त्याचाच फरक म्हणजे सोमवारी तब्बल ३ हजार ९०८ नागरीकांना बुस्टर डोस देण्यात आला आहे. तर आतार्पयत ९७ हजार ५३६ नागरीकांनी बुस्टर डोसची मात्र घेतली आहे.
मोहीमेच्या माध्यमातून महिन्याला सुमारे एक लाख नागरीकांना कॉल जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पुढील आठवड्यापासून वागळे औद्योगिक केंद्र, टीसीएस यासारख्या औद्योगिक ठिकाणांवर देखील बुस्टर डोसची मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.