मुख्यमंत्र्यांच्या नावाने ऑपरेशन फसवा-फसवी

उल्हासनगरमधील रुग्णालयाचा प्रताप

ठाणे : रुग्ण दाखल नसतानाही त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार केल्याची बनावट कागदपत्रे तयार करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे पाच लाखांचा निधी उकळणाऱ्या आंबिवली येथिल खाजगी रुग्णालयाच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी लुटणारे रॅकेट उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्र. सहाय्यक संचालक देवानंद धनावडे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात १७ एप्रिल २०२५ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा गैरवापर होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून खडकपाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दखल केला आहे. आंबिवली येथिल गणपती मल्टिस्पेशालिस्ट या रुग्णालयाच्या डॉक्टर आनंदुर्ग ढोनी, प्रदीप पाटील आणि ईश्वर पवार राहणार धुळे यांनी आपसात संगनमत करून २६ मे २०२३ ते १० जुलै २०२३ दरम्यान रुग्णालयात १३ गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल नसतानाही रुग्णांवर उपचार करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याची बनावट कागदपत्रे तयार करून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री साह्ययता निधीमधून चार लाख ७५ हजारांचा निधी मिळवला होता. त्याबाबतची तक्रार मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे करण्यात आली होती. त्याची चौकशी ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली होती. त्याचा अहवाल तयार करून या रुग्णालयाच्या डॉक्टर आणि इतर दोन जणांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुगे हे करत आहेत.