फॉक्सकॉन : बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

बदलापूर : तरुणांना नोकऱ्या नसताना महाराष्ट्रातील वेदांतचा उद्योग गुजराथला न्यायचा अधिकार केंद्र आणि राज्य  सरकारला कोणी दिला असा सवाल विचारत बदलापूरमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली.

युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षा प्रियांका दामले यांच्या नेतृत्वाखाली आज बदलापूरच्या घोरपडे चौकात फॉक्सकॉन उद्योग गुजरातला नेण्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. बेरोजगारांना नोकऱ्या देणार, बँकेमध्ये पैसे जमा करणार अशा घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्या होत्या. कोरोना काळात असंख्य जणांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. युवक बेरोजगार झाले आहेत, फॉक्सकॉनमुळे आशा  पल्लवित झाल्या होत्या, त्याचवेळी संबंधित प्रकल्प गुजरातला नेण्यात  आल्याबद्दल प्रियांका दामले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

फॉक्सकॉन प्रकल्पामुळे लाख रोजगार निर्मितीला वाव मिळणार होता, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना काही किरकोळ त्रुटी बाकी होत्या. त्याची पूर्तता होण्याआधीच राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये  वेदांताचा उद्योग गेल्याचा आरोप प्रियांका दामले यांनी केला.

जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, युवक अध्यक्ष  विनय सरदार, अनिता पाटील, अनिसा खान, निशा निकाळे, हर्षाली गायकवाड, प्राची थिटे, सोनल मराडे, संतोष कदम आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.