* ठाण्याची तेजस्वी देशपांडे देशात ९९व्या स्थानी
* संस्थेची दीपाली महतो १०५व्या स्थानी
ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेत बाजी मारण्याची परंपरा ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवली असून यावर्षी चार विद्यार्थी चमकले आहेत.
युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला आहे. ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची दीपाली महतो हिचा देशात १०५वा क्रमांक आला आहे. अंकिता पाटील हिचा ३०३, कृषिकेश वीर ५०५ आणि सृष्टी कुळये ही ८३१वी आली आहे. चिंतामणराव देशमुख संस्थेचे ४६ विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसले होते. त्यापैकी दहा जण उत्तीर्ण झाले होते. मुलाखती देऊन चार विद्यार्थी यशस्वी झाल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख महादेव जगताप यांनी दिली. मागील वर्षी सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
युपीएससी आयोगाकडून 2024 च्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून upsc.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे या उमेदवाराने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण १००९ उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील १०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशात उत्तीर्ण १००९ विद्यार्थ्यांमध्ये ३३५ सर्वसाधारण, १०९ ईडब्लूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी, ८७ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. विशेष म्हणजे १७ एप्रिल २०२५ पर्यंत या युपीएससी परीक्षांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर, ७ जानेवारी २०२५ पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती. युपीएसीकडून २०२४च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती काढली होती.
दरम्यान युपीएससी परीक्षेत यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला असून महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्याने पटकावला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने 303 वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे, मुलींनी देखील यंदाच्या परीक्षेत आपली सरशी दाखवून दिली आहे.