बदलापूर: धुळवडीनंतर नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बदलापूरमधील चामटोली गावात घडली आहे.
बदलापूरजवळील चामटोली येथील पोद्दार कॉम्प्लेक्समध्ये राहणारी चार अल्पवयीन मुले धुळवडीनंतर उल्हास नदीत अंघोळ करण्यासाठी गेली होती. आर्यन मेदर (15,) आर्यन सिंग (16), सिद्धार्थ सिंग (16) आणि ओमसिंग तोमर (15) अशी या मुलांची नावे आहेत.
चौघेही उल्हास नदीत पोहण्याचा आनंद घ्यायला गेले असताना, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ही माहिती दिल्यावर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या चारही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. सध्या या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूर पूर्व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.