ठाणे: अंगावर झाड कोसळल्याने चारजण जखमी झाल्याची घटना ठाण्यातील खारटन रोड येथे घडली. जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश असून त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पावसाळा येताच ठाण्यामध्ये झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. उन्हाच्या तडाख्यातही अनेक झाडांची पडझड होत असल्याचा अनुभव आहे. यामध्ये आतापर्यंत ठाणेकरांना जीवही गमवावा लागला असून लाखो रुपयांच्या मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. अशीच एक घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या खारटन रोड येथे घडली. येथील फुलांच्या दुकानाशेजारी असलेले झाड अचानक उन्मळून पडले. त्यामुळे दुकानात असलेल्या चार जणांना दुखापत झाली.
मेघना अडसुळे (४५), उन्नती अडसुळे (१६), सांची अडसुळे (१५) आणि उमेश होनमाने (७५) अशी जखमींची नावे आहेत. त्यापैकी सांची हिला मुका मार लागला आहे. सर्व जखमींना कळवा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींची सुटका करत झाड कापण्यास सुरुवात केली आहे. मात्र पडलेले झाड मोठे असल्याने त्यांनी वृक्षप्राधिकरण विभागाला मदतीसाठी पाचारण केले असून पुढील कार्यवाही करण्याची सुचना दिली आहे.