विरारमधील सांडपाणी प्रकल्पात गुदमरून चौघांचा मृत्यू

वसईः  विरारमधील ग्लोबल सिटी येथील सांडपाणी प्रकल्पात सफाई करण्यासाठी उतरलेल्या चार कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात रुस्तुमजी शाळेजवळील खासगी सांडपाणी प्रकल्प आहे. मंगळवारी दुपारी तुंबल्याने तो साफ करण्यासाठी एक कर्मचारी २५ ते ३० फूट खोल टाक्यांमध्ये उतरला होता. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने दुसरा कर्मचारी टाकीत उतरला होता. तोही बराच वेळ झाला तरी बाहेर आला नाही म्हणून तिसरा कर्मचारी टाकीत उतरला होता. तोही वर न आल्याने चौथा कर्मचारी खाली उतरला होता. या घटनेत चारही कर्मचाराचा गुदमरून मृत्यू झाला.

शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७) निखिल घाटाळ (२४) आणि सागर तेंडुलकर (२९) अशी मृतांची नावे आहेत.

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चारही कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, सांडपाणी प्रकल्पात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याची गंभीर बाब आता उजेडात आली आहे. तसेच या सांडपाणी प्रकल्पाची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.