भाईंदर : वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मीरा-भाईंदर शहरातील वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी व्यापक प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला आहे. १ जानेवारी ते आजपर्यंत बेशिस्त वाहनचालकांकडून चार कोटी ४७ लाखांचा दंड वसूल केला आहे. जनजागृती व प्रबोधन करूनही वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाईची मोहीमही अधिक व्यापक केली जाणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालय झाल्यापासून वाहतूक पोलिसांकडून जनजागृती व वाहनचालकांना नियमांचे धडे दिले जात आहेत. मात्र, बेशिस्त वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत आहेत. बेकायदा पार्किंगचा प्रश्न शहरात गंभीर बनला आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
‘नो पार्किंग झोन’ मध्ये वाहने उभी करणाऱ्या ८८ हजार ६८७ वाहनांवर कारवाई केली आहे. ११६ मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणाऱ्या १९ हजार ७९४ वाहनचालकांवर कारवाई करून ३९ लाख ५८ हजारांचा दंड आकारला आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या व सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. याशिवाय, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, धोकादायकरीत्या वाहन चालवणे आदी प्रकरणांतही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.