नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिकेने शहरात करोडो रुपयांची दौलतजादा करत खर्च करून रस्त्यांच्या दुभाजकांत अनेक कारंजी बसवली आहेत. मात्र पाण्याविना त्यांची दुरवस्था झाली आहे. तर दुर्लक्षामुळे कृत्रिम गुलाबी फ्लेमिंगो पांढरे पडून त्यांचे रूपांतर बगळ्यांत झाले आहे.
नवी मुंबई शहरात मागील वर्षी फ्लेमिंगो सीटी संकल्पना घेऊन शहरात हजारो गुलाबी कृत्रिम फ्लेमिंगो बसवण्यात आले होते. मात्र एका उन्हाळ्यातच या फ्लेमिंगोचा रंग उडून फ्लेमिंगोचे सफेद बगळे झाल्याचे सर्व नवी मुंबईकरांनी पाहिले आहे. आता परत या सफेद झालेल्या फ्लेमिंगोंना गुलाबी रंग देण्याचे काम शहरभर सुरू आहे.
धुलिंकणांमुळे हवेत प्रदूषण वाढत चालले आहे. त्यावर उपाय म्हणून शहरात आणखी कारंजे बसण्याचे नियोजन असल्याचे मनपा आयुक्त (अतिरिक्त कारभार) अभिजित बांगर यांनी बोलून दाखवले आहे.
स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करुन शहरातील चौकाचौकात पाण्याचे कारंजे बसवले होते. यातील मोठे कारंजे वगळता इतर सर्व कारंजे आजही पाण्यासाठी आसुसलेले असल्याने हे कारंजे बंद आहेत. त्यांची पुरती दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आहे त्या कारंज्यांची देखभाल न करता आणखी कारंजे उभे करून स्वच्छ भारत अभियानाच्या नावाचे मनपा अधिकाऱ्यांनी मनपाची तिजोरी स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे का? असा सवाल पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
शहरात रस्त्याच्या दुभाजकांत असलेल्या कारंजांमधील पाणी फुलवणारी यंत्रसामुग्री सातत्याने चोरीला जात असल्याने बहुतांश कारंजी बंद आहेत. तरी देखील ते पूर्ववत सुरू करण्याबाबत विभागवार कार्यकारी अभियंत्यांना सूचना देण्यात येतील व चोरीबाबत रीतसर तक्रार केली जाईल, शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.