महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेमुळे ‘फोस्ककॉन’ राज्याबाहेर

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आरोप

ठाणे : महाविकास आघाडी सरकारने कंपनीला पॅकेज जाहीर केले असते तर वेदांता-फोस्ककॉन प्रकल्प गुजरातला गेलाच नसता, असा आरोप करीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या अडीच वर्षात राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती दिली. तर फोस्ककॉनच्या तोडीचा दुसरा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

वेदान्ता-फोस्ककॉन प्रकल्प हा महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्याने राज्यात विरोधकांकडून शिंदे -फडणवीस सरकारविरोधात रान उठवले जात आहे, आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज ठाण्यात येऊन तातडीची पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई हे जबाबदार असून त्यांनी २०२०मध्ये फोस्ककॉन कंपनी राज्यात येण्यास उत्सुक नसल्याचे म्हटले होते, त्या बातमीची कात्रणे दाखवत त्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ चर्चा, दौरे करून उद्योजक प्रकल्प सुरु करीत नाहीत, त्याकरिता राज्याच्या हायपॉवर कमिटीची बैठक घेऊन सवलतीचे पॅकेज जाहीर करावे लागते. मात्र महाविकास आघाडी सरकारने कोणतीही बैठक घेऊन पॅकेज जाहीर केले नाही. ते आता पॅकेजबाबत बोलत आहेत, असा आरोप श्री. सामंत यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने १५ जुलैला घेतलेल्या हाय पॉवर कमिटीच्या बैठकीत तब्बल ३८ हजार ८३१ कोटींचे पॅकेज शिंदे-फडणवीस सरकारने या वेदांता-फोस्ककॉन प्रकल्पाला जाहीर केले होते. तरी देखील हा प्रकल्प गुजरातला गेला. महाविकास आघाडीने सहा महिन्यापूर्वी हाय पावर मीटिंग घेऊन पॅकेजचा निर्णय घेतला असता तर वेदांताच्या सेमी कंडक्टरचा प्रकल्प गुजरातला गेला नसता असा आरोप श्री. सामंत यांनी केला.

चांगले झाले तर मी केले, वाईट झाले तर सरकारने केले, अशी भूमिका विरोधकांनी मतांच्या राजकारणासाठी घेऊ नये प्रकल्पांमध्ये राजकारण करू नये, असे आवाहन केले. या प्रकल्पाबाबत उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी रशियामधून फोन करून विचारणा केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली. त्यावेळी वेदांता-फोस्ककॉनपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. ते दिलेले वचन पाळतात, असे सांगत लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. गुजरातपेक्षा जास्त सवलती देऊनही कंपनीने गुजरातला प्रकल्प का नेला, याची विचारणाही कंपनीला करणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे हे शिवसेनेचे खासदार असून मुंबईत एक आणि राजापुरात दुसरी भूमिका घेतात, हे योग्य नाही. केवळ राजकारणासाठी राजकारण न करता कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहन करीत विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.

ठाण्यातील उद्योगांबाबत कृती आराखडा

ठाणे जिल्ह्यातील उद्योग, कंपन्यांची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार आहे. विविध उद्योगांबाबत कृती आराखडा तयार केला जाणार असून त्याबाबत संबंधित उद्योजकांकडून सूचना मागविण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की दहा दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत रिक्षा युनियनच्या समस्याबाबत बैठक घेतली जाणार असल्याने संप मागे घेण्यात आला आहे.

अडीत वर्षात किती प्रकल्प बाहेर गेले, याची यादी जाहीर करणार

डोंबिवली सर्टर्डे क्लबतर्फे इंजिनिअर डे निमित्त राज्य स्तरीय उद्योजकता परिषदेचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस उद्योग मंत्री सामंत हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती प्रकल्प महाराष्ट्रबाहेर गेले, याची यादी जाहीर करणार असल्याचं सांगितलं.

डोंबिवलीतील कारखाने स्थलांतर आणि प्रदूषणावर काय म्हणाले?

डोंबिवलीतील 156 कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे. त्याविषयी उद्योजक संघटनेशी चर्चा करुन त्यावर बैठक घेतली जाईल. त्याचबरोबर डोंबिवली एमआयडीसीबाबत वारंवार प्रदूषणाच्या घटना घडतात त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत या भागाचा येत्या आठ दिवसात दौरा केला जाईल. प्रदूषण होऊ नये यासाठी सूचना केली जाईल. वारंवार सांगूनही उद्योजक ऐकणार नसतील तर परिस्थिती पाहून कारवाई केली जाईल, असे उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे.