एआयएडीएमके आणि डीएमकेच्या माजी आमदारांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजपाने दक्षिणेकडील राज्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. असे असतानाच तमिळनाडूत डीएमके आणि एआयएडीएमके पक्षाचे १५ माजी आमदार आणि डीएमके पक्षाच्या एका माजी खासदाराने भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपाचे बळ वाढणार आहे.

बुधवारी (७ फेब्रवारी) भाजपाच्या दिल्लीमधील मुख्यालयात या सर्व माजी आमदार आणि माजी खासदारांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, एल मुरुगन तसेच तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई आदी नेते उपस्थित होते. यावेळी एकूण १६ नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार भाजपात प्रवेश केलेल्या यातील १५ आमदारांनी याआधी डीएमके, एआयएडीएमके, काँग्रेस, डीएडीएके अशा वेगवेगळ्या पक्षांत काम केलेले आहे.

या पक्षप्रवेशावर के अन्नामलाई यांनी प्रतिक्रिया दिली. “नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या काही नेत्यांमध्ये असे काही चेहरे आहेत, जे गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. आज हे सर्व नेते भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात आले आहेत. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आशीर्वाद घेऊन भाजपासाठी काम करण्यासाठी ते आले आहेत. तमिळनाडूत पहिल्यांदाच १६ वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे समूहाने भाजपात प्रवेश केला आहे,” असे अन्नामलाई म्हणाले. तसेच ‘एन मन एन मक्कल’ यात्रेदरम्यान आणखी दोन माजी आमदारही भाजपात सामील झाले होते, असे त्यांनी सांगितले.

बुधवारी एआयएडीएमकेच्या काही माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यात वाडीवेल (करूर), चॅलेंजर दुराईसामी (कोइम्बतूर), पी एस कंधासामी (अरावाकुरिची), एम व्ही राथिनम (पोल्लाची), आर चिन्नासामी (सिंगानलूर), व्ही आर जयरामन (थेनी), एस एम वासन (वेदासंथूर) पी एस अरुल (भुवनगिरी), आर राजेंद्रन (काटुमन्नारकोइल), सेल्वी मुरुगेसन (कंगेयाम) ए रोकिनी (कोलाथूर) या आमदारांचा समावेश आहे. यामध्ये एआयएडीएमकेचे नेते तथा माजी मंत्री गोमथी श्रीनिवासन यांचाही समावेश आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर या नेत्यांनी मोदींच्या नावाचा जयघोष केला. तसेच भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, अनेक माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केला असला तरी यातील बहुसंख्य नेत्यांचा तमिळनाडूत म्हणावा तसा राजकीय प्रभाव राहिलेला नाही. यातील काही नेते हे १९७० ते १९८४ या काळात आमदार राहिलेले आहेत. तेव्हा एम जी रामचंद्रन तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.

याच कारणामुळे या नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलेला असला तरी डीएमके आणि एआयएडीएमकेने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आगामी काळात भाजपाला या नेत्यांचा उयोग होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.