ठाणे: शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर रघुनाथ मोरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन त्यांनी त्या काळात शिवसेनेची ताकद वाढवली. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमीच सक्रिय होते.
जिल्हाप्रमुख पदाची धुरा सांभाळताना अचानक त्यांचा अपघात झाला. त्यांना मोठी दुखापत झाली होती. तेव्हापासून ते राजकारणापासून अलिप्त होते. काही दिवसांपूर्वीच रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद यांचा विरार येथील एका रिसाॅर्टमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. रघुनाथ मोरे यांच्या पश्चात त्यांचे भाऊ, पुतणे, मुली, नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून मोरे यांची ओळख होती. दिघे यांच्या निधनानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर रघुनाथ मोरे यांनी ठाण्याची शिवसेना ताकतीने वाढवली. २००२ साली ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे ६० पेक्षा जास्त नगरसेवक त्यांनी निवडून आणले. शिवसेनेच्या फुटीनंतरही रघुनाथ मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्याचे पुत्र मिलिंद मोरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात निष्ठा कायम ठेवत उपशहरप्रमुख पदाची जबाबदारी पार पडली. काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले होते.
रघुनाथ मोरे यांची काही दिवसांपूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. रघुनाथ मोरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच आमदार संजय केळकर यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आज दुपारी ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.