ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना उबाठा गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केला असतानाच, भाजपाने दुपारीच उबाठा गटाला धक्का दिला.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्र. ५ मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरीशेट्टी निवडून आल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उबाठा गटाबरोबर राहणे पसंत केले होते. तर त्यांचे पती भास्कर बैरीशेट्टी हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे उपशहरप्रमुख म्हणून कार्यरत होते. बैरीशेट्टी यांच्यासह युवासेनेचे ओवळा-माजिवडा चिटणीस सागर बैरीशेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी बैरीशेट्टी यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता. यापूर्वी २०१२ मध्ये रागिणी बैरीशेट्टी यांनी भाजपाच्या उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना कमी मताधिक्याने पराभव पत्करावा लागला होता. वर्तकनगर, शिवाईनगर, वसंत विहार परिसरात नगरसेवकपदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरीशेट्टी दांपत्याने विविध उपक्रम राबविले आहेत.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाडून, भाजपाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी कार्य करणार असल्याचे भास्कर बैरीशेट्टी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या वेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिताराम राणे, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, भाजपाच्या कामगार प्रकोष्टचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जायसवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.