कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातील घटना
कल्याण : कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटातील एका महिलेने शिंदे गटाच्याच माजी नगरसेवकाला कामाच्या श्रेयवादातून चांगलाच चोप दिल्याची घटना ताजी असतांनाच कल्याण पूर्वेतही शिंदे गटाच्याच एका माजी नगरसेवकाने शिंदे गटाच्याच उपशहर प्रमुखाला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातच पोलिस अधिकाऱ्याच्या समोरच जबरी मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दिलीप दाखिनकर असे जखमी असलेल्या उपशहर प्रमुखाचे नाव असून मल्लेश शेट्टी या माजी नगरसेवकाने त्यांना मारहाण केली आहे.
कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर येथील नागरी वस्तीतील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची वहिनी असलेल्या माजी नगरसेविका व शिवसेना उपशहर प्रमुख दिलीप दाखिनकर यांच्यातही पाणी पुरवठा समस्या सोडवण्यावरून श्रेयवाद निर्माण झाला आहे. या वादातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होऊन हे प्रकरण थेट कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेले.
या ठिकाणी दिलीप दाखिनकर व मल्लेश शेट्टी हे एकमेकांसमोर आले असता मलेश शेट्टी यांनी कोणत्या तरी शस्त्राने दिलीप दाखिनकर यांच्या डोक्यावर पोलिस ठाण्याच्या आवारातच प्रहार करून त्यांना जखमी केल्याचे दाखिनकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्येही कैद झाला असल्याचे बोलले जात आहे.
मल्लेश शेट्टी यांनी आपल्यावर पोलिस अधिकाऱ्यांसमोर कसल्यातरी शस्त्राने डोक्यात प्रहार करून आपणांस जखमी केले असून अशा प्रकारे पोलिसांसमोर मारझोड करत मल्लेश शेट्टी हे आपली दहशत पसरवू पहात आहेत, असा गंभीर आरोपही दिलीप दाखिनकर यांनी केला आहे. आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दाखीनकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिला.
याबाबत मल्लेश शेट्टी यांचे म्हणणे आहे की, दाखीनकर हे खोटे आरोप करत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वहिनीचा विनयभंग करण्याची भाषा केली. पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या अनेकवेळा तक्रारी करूनही तोडगा निघत नाही. या संपूर्ण समस्येशी त्याचा काहीही संबंध नाही, तरीही माझी बदनामी केली जात असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान या सर्व प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.