मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा
ठाणे: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील काही नगरसेवकांचा गट राष्ट्रवादीला रामराम करून भाजपामध्ये जाणार असल्याची कुणकुण सध्या कळवा परिसरात सुरु झाली आहे.
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता परंतु राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी अजितदादा पवार यांना साथ दिली होती, परंतु कळवा भागातील नगरसेवक आ.आव्हाड यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. मागिल विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला राज्यात फटका बसला होता. ठाणे जिल्ह्यातून मात्र आ.आव्हाड यांना ९० हजारपेक्षा जास्त मतधिक्याने निवडून दिले होते.
मागील काही महिन्यांपासून कळवा भागातील नगरसेवकांच्या मनात चलबिचल सुरु झाली आहे. या नगरसेवकांवर मोठ्या प्रमाणावर दबाव येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एक गट काही दिवसांत भाजपामध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्याची जोरदार चर्चा कळवा भागात सुरु झाली आहे. ते नगरसेवक कोण आहेत, याची माहिती राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
कळवा प्रभाग समितीवर राष्ट्रवादीची मागील पाच वर्षे सत्ता होती, ती सत्ता यापुढे कायम ठेवायची असेल तर राष्ट्रवादी पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांना थोपवणे आवश्यक आहे. अन्यथा कळवा-मुंब्रा येथिल सत्ता भविष्यात राष्ट्रवादी पक्षाला सोडावी लागणार आहे.
राष्ट्रवादीची एक विद्यमान नगरसेविका आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. त्याचा देखिल मोठा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. आव्हाड यांना नगरसेवकांची बाजू समजून घेऊन त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. अन्यथा कळवा भागात राष्ट्रवादीत फुट अटळ असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.