तीन वर्षांत प्रथमच जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण शून्य

ठाणे : मागील तीन वर्षानंतर जिल्ह्यात प्रथमच एकाही नवीन कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली नाही, त्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि ठाणे ग्रामिण परिसरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आत्तापर्यंत सात लाख ४७,३५६ रूग्ण बाधित सापडले आहेत तर सात लाख ३६,१०२जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात आणि घरी ५६जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत ११,९६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दोन अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका परिसरात कोरोना रूग्णवाढ मोठ्या प्रमाणावर झाली होती. अनेक रुग्णांना बेड देखील मिळत नव्हते. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांनी आपले जीव गमावले. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आल्याने कोरोना रूग्णवाढ आटोक्यात आली आहे.