डोंबिवलीत प्रथमच आगरी वधू-वर समाज सामुहिक विवाह सोहळा

डोंबिवली : आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवलीच्या वतीने डोंबिवलीत प्रथमच आगरी वधू-वर सामुदायिक विवाह सोहळा शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या आवारात पार पडला. या विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे लग्न कल्याण-डोंबिवलीतील अनेक राजकीय नेतेमंडळी आणि आगरी समाजासमोर झाले.

शनिवारी सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर या सात जोडप्यांचे लग्न लागले. संस्थेला कोरोना महामारीत आपला हा सामाजिक उपक्रम दोन वर्ष बाजूला ठेवावा लागला होता. मात्र या काळातही संस्थेने आपला उद्देश यशस्वी करण्यासाठी आगरी समाजातील मान्यवरांच्या भेटी घेणे सुरूच ठेवल्याची माहिती काळू कोमास्कर यांनी दिली.

या लग्न सोहळ्यात संस्थेचे मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील, कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांसह संस्थेचे पदाधिकारी अॅड. तृप्ती पाटील, गजानन पाटील, जगदीश ठाकूर, मधुकर माळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनसे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी प्रत्येक जोडप्यास एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तर मराठवाडा विदर्भ रहिवाशी सेवा संस्था कल्याण-डोंबिवलीच्या वतीने अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी वधू-वरास संसारोपयोगी भांडी भेट म्हणून दिली.