मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी आज माउंट नन पर्वतारोहण मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब (सीआरएएससी) ने ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त हिमालयातील नन पर्वतावर चढाई करण्याची ही मोहीम आखली आहे. यावेळी श्री मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) अध्यक्ष सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन आणि टीम सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब (सीआरएएससी) उपस्थित होते.
सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब (सीआरएएससी) चे पथक श्री हेमंत जाधव, मुंबई विभागाच्या अभियांत्रिकी शाखेचे मुख्य कार्यालय अधीक्षक (नेतृत्वात) आणि श्री संदीप मोकाशी, ठाकुर्ली येथील सेंट्रलाइज्ड इलेक्ट्रिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे कार्यालय अधीक्षक या मोहिमेसाठी पुढे जातील. पुढील वर्षी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे या संघाचे ध्येय आहे. ही मोहीम ८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे.
लडाख प्रदेशातील सूर खोऱ्यात वसलेले माउंट नून हे अतिशय कठीण आणि थंड म्हणून ओळखले जाते. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून २३,४०९ फूट (७१३५ मीटर) आहे. याला प्री-एव्हरेस्ट मोहीम म्हणून ओळखले जाते. या टीमने तरुण मनांना ट्रेकिंग आणि किल्ल्यांचे मूल्य समजावे याकरिता आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर मोहिमा आयोजित केल्या आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी अनेक बचाव मोहिमा पार पाडल्या आहेत ज्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. यांनी टीम आपत्ती झोनमध्ये मदत करणे, सायकलिंग मोहिमेचे नियोजन करणे आणि लोकांना सायकलिंगचे महत्त्व शिक्षित करणे यासारख्या विविध कार्यक्षेत्रामध्ये गुंतलेली आहे.