आकाशात ढगांची गर्दी झाली, पावसाच्या सरी पडू लागल्या की मोराप्रमाणे मनदेखील थुईथुई नाचू लागते. रखरखत्या उन्हामुळे मनाला आलेला कोरडेपणा दूर होतो. आणि सारी श्रुष्टीदेखील हिरवा नवा शालू घेऊन सजते. मग पावसाळी सहलींचे आयोजन होते, कांदाभजींवर ताव मारला जातो आणि मग सर्दी, खोकला आणि त्यापासून ताप या लक्षणांना सुरुवात होते. शिवाय निसर्गात अचानक आलेल्या गारव्यामुळे जेष्ठ नागरीकांची सांधेदुखी डोकेवर काढते. पाणी गढूळ होते, वनस्पती आम्लविपाकी होतात. त्यामुळे अपचन, करपट ढेकर, ऍसिडिटी यांची देखील सुरुवात होते. या निसर्गातील बदलांमुळे शरीरात वातप्रकोप होतो आणि पित्त शरीरात वाढू लागते.
निसर्गातील होणाऱ्या या बदलांमुळे शरीरात देखील बदल होतात. अशावेळी आपण आपले अन्नपान, विहार या गोष्टींमध्ये बदल केला तर आपल्याला निसर्गाचा आनंदही घेता येतो आणि आरोग्य देखील सांभाळता येते.
पावसाळ्यातील आहार :
धान्य : भात – पावसाळ्यात भात बनविण्यासाठी जुना तांदूळ वापरावा शिवाय भात बनवताना तो तांदूळ भाजून घ्यावा कुकर ऐवजी भात पातेल्यात सुट्टा शिजवावा.
पोळी : पोळी / भाकरीसाठी देखील जुनेच धान्य वापरावे. जुने धान्य पचायला हलके असते. शक्यतो ज्वारी किंवा नाचणीची भाकरी घ्यावी. पोळी गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर ओवा किंवा ओव्याची पावडर घालावी. म्हणजे पोटात गॅसेस होत नाहीत.
भाजी : या काळात पालेभाज्या टाळाव्यात. मोड आलेले कडधान्ये खाल्याने पोट फुगते, पोटात दुखते म्हणून मोड आलेली कडधान्ये टाळावीत. त्याऐवजी मूगाचे, तुरीचे वरण, अख्खे मूग भाजून, मसूर ह्या गोष्टी घ्याव्यात.
या पावसाळ्यात अनेकविध पावसाळी भाज्या बाजारात पहावयास मिळतात. फोडशीची भाजी, शेवग्याचा पाला, कवळाची भाजी, घोळाची भाजी, टाकळा, करवंद, ढेमसे, गुळवेल, कोरळची पाने, केळफूल अशा नानाविध पावसाळी भाज्या आरोग्यास हितकर असतात. त्याशिवाय नेहमीच्या फळभाज्या जसे दुधी, लालभोपळा, पडवळ, परवर, दोडके, शिराळे, घोसाळे, श्रावण घेवडा, गाजर या भाज्या घ्याव्यात. भाज्या बनवताना तेलाच्या किंवा तुपाच्या फोडणीवर करुन त्यात धने-जिरे-आले-लसूण-खोबरे हा मसाला वापरावा. म्हणजे पचायला हलक्या होतात.
चटणी : ओली खारीक, विलायती चिंच, नारळ ह्या वेगवगेळ्या चटण्या रोचन म्हणून घ्याव्या.
भोजनात रोज १ चमचा मध घ्यावा.
पाणी : ह्या दिवसांमध्ये पाणी गढूळ असते म्हणून शक्यतो पाणी उकळून घ्यावे. उकळतांना त्यात १ तुकडा सुंठ टाकावी. त्याने भूकही वाढते व मळमळ इ. लक्षणे कमी होतात.
विहार :
* लवकर उठावे.
* स्नान गरम पाण्याने करावे. त्यावेळी आंबेहळद. अगरु, वचा यांचे उद्वर्तन वापरावे.
* शक्यतो पायी चालू नये, चालायचे झाल्यास साठलेल्या पाण्यातून चालू नये.
* पावसाचे तुषार अंगावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
* आंघोळीनंतर घालण्याचे कपडे धूपन करून घालावे म्हणजे सर्दी-ताप होत नाही.
* सर्दी झाल्यास सुंठ, वेखंडाचा लेप कपाळ व नाकाला लावावा. म्हणजे सर्दी त्वरित बरी होते.
* आल्याचा रस २-३ थेंब नाभिमध्ये घालावा त्याने भूक वाढते, पोटात गॅस धरत नाही, पोटदुखी थांबते.
पंचकर्म :
या काळात वात वाढत असल्याने स्नेहन -स्वेदन व बस्ति यांचा उत्तम उपयोग होतो.
स्नेहन – विशिष्ट औषधांनी सिद्ध तेल अंगाला लावावे.
स्वेदन – पोट दुखल्यास पोट शेकून घेणे. तसेच सांधे दुखल्यासही पंचकर्मातील विविध स्वेदन जसे चुर्णपोट्टली ,पिंडस्वेद ,नाडीस्वेद यांचा उपयोग होतो.
बस्ति – स्वास्थ्य टिकवण्यासाठी बस्ती वैद्यांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा.
या पद्धतीने आपण आपला आहार – विहार – आचरण यात बदल करावे म्हणजे आपले स्वास्थ्य टिकून राहते. आणि कोणती लक्षणे आलीच तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्य्यानुसार औषधोपचार आणि पंचकर्म केल्यास आरोग्य टिकून राहते .
– डॉ. गौरी मंदार बोरकर
प्रमुख चिकित्सक : श्रीरुक्म चिकित्सालय
ठाणे / डोंबिवली / पुणे7700954400