ठाण्यातील उड्डाणपुलांनी झेलले २० उन्हाळे-पावसाळे!

आयआयटी करणार स्ट्रक्चरल ऑडिट

ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून १५ ते २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले उड्डाणपूल आता नागरिकांच्या वापरासाठी सुरक्षित आहेत का? याची चाचपणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण २६ पुल आहेत. यामध्ये एएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम तसेच महापालिकेचे उड्डाण पूल आहेत. त्यापैकी महापालिकेच्या मालकीचे आठ उड्डाणपूल आहेत. कोपरी सॅटिस आणि नवीन ठाणे स्टेशन असे दोन उड्डाणपूल प्रगतीपथावर आहेत. कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन उडाणपूल काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बाजूलाच बांधण्यात आलेल्या दुसऱ्या उड्डाणपुलाला देखील आता १५ ते २० वर्षे झाली आहेत. या दुसऱ्या उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तिसऱ्या उड्डाणपुलाची देखील निर्मिती करण्यात आली असली तरी दोन्ही जुन्या उड्डाणपुलावर वाहतूक सुरूच ठेवण्यात आली असल्याने हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? हे आता तपासले जाणार आहे.

कळवा खाडी उड्डाण पुलासोबतच मुंब्र्याच्या उडाणपुलाचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्याचसोबत ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १० ते १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला सॅटिस पश्चिम उड्डाणपुलाचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यासाठी आयआयटी या नामांकित संस्थेची मदत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

शहरातली महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पांना जवळपास १५ ते २० वर्षे झाली असल्याने स्लॅब, पिलर्स, साऊंड बेरिंग आणि सळ्यांची तपासणी केली जाणार आहे. आयआयटी मुंबईच्या पथकाने तिन्ही पुलांची पाहणी केली आहे. पुढील आठवड्यात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरूवात होणार आहे. दिवसा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रात्री युद्धपातळीवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.