जनजागृती-कारवायानंतरही प्लास्टिक बंदीचा फज्जा
ठाणे : देशात प्लास्टिक बंदी केली असली तरी ठाण्यात मात्र मुलुंड येथून प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा होत असल्याने ठाण्यात प्लास्टीक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. प्लास्टिक बंदी ठाण्यात लागू होऊन चार महिने उलटून गेले आहेत. ठाणे शहरात महानगरपालिकेकडून बंदीची अंमलबजावणी केली जात आहे. दररोज कारवाई होत आहे. विक्रेत्यांकडून प्लास्टिक जप्त केले जात असून, लाखोंचा दंडही वसूल केला जात आहे. परंतु प्लास्टिकचा वापर अजूनही सर्रासपणे सुरू आहे.
देशात एकल वापर प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल अडीच हजार किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे आठ लाख दंड वसूल केला आहे. दुसरीकडे मात्र बाजारपेठेतील व्यापारी आणि छोटे विक्रेते प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने देशातील एकल प्लास्टिक वापरावर मे महिन्यात पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखिल त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणारे व्यापारी, छोटे-मोठे व्यापारी, हातगाडीवर माल विकणारे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
ठाणे महापालिकेच्या अधिकारी-कर्मचारी यांनी जून महिन्यात २,२५८ दुकानांवर अचानक धाड घालून १६२९ किलो प्लास्टिक जप्त करून पाच लाख ९,८०० इतका दंड वसूल केला. जुलै महिन्यात २,७२४ दुकानांची अचानक तपासणी करून ९४२ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन लाख ९१,९०० इतका दंड वसूल केला आहे. मागील दोन महिन्यांत ४,९८२ दुकानांना अचानक भेट देऊन २,५७१ किलो प्लास्टीक जप्त केले असून आठ लाख १,७०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका अधिकारी-कर्मचारी प्लास्टीक पिशव्यांच्या विरोधात कारवाई करत असले तरी देखील हातगाडी, मटण विक्रेते, भाजी आणि फळ विक्रेते मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसत आहेत. महापालिका प्रशासनाने प्लास्टिक वापराविरोधात मोहीम तीव्र करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्लास्टिक वापरामुळे ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या खर्चात दरवर्षी प्रचंड वाढ होत आहे. पर्यावरणाला देखिल धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे प्लास्टिक बंदी विरोधात नागरिकांनी देखिल सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.
जनजागृती आणि कारवायानंतरही ठाण्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. विशेष म्हणजे मुलुंड चेक नाक्याजवळ मुंबईच्या हद्दीत प्लास्टिक पिशव्यांचा मोठा होलसेल बाजार असून या ठिकाणी शेकडो प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारी घाऊक दुकाने असून संपूर्ण ठाणे शहर आजूबाजूच्या परिसरात या ठिकाणावरून प्लास्टिक पिशव्यांच्या पुरवठा करत आहेत. दिवसभर बिनदिक्कतपणे या परिसरात प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असताना मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना या बद्दल काहीच माहीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.