आयपीएलच्या सरावाला फ्लड लाईटचा ‘अडथळा’

* उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेना
* तीन टीमच्या अर्जावर पालिकेचा शेरा

ठाणे: ठाणे शहराचे मानबिंदू असलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकूलात भविष्यात आयपीएल सामने भरवण्याचे वेध असताना सरावासाठी पथकांना क्रीडांगण देण्यासाठीही अडचण येत असल्याचे समोर आले आहे. याला फ्लड लाईटचे उद्घटान हे कारण ठरले आहे.

सुमारे २० कोटी रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या फ्लड लाईटचे काम पूर्ण होऊन एक वर्ष लोटले आहे. या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला. मात्र उद्घटनासाठी त्यांची तारीख मिळत नाही. परिणामी सरावासाठी आलेल्या अर्जाला मंजुरी देताना उद्घाटन झाले तरच स्टेडीअम मिळेल असा शेरा पालिकेच्या क्रीडा विभागाला मारण्याची वेळ ओढावली आहे.

टी- २० वर्ल्डकपनंतर मनोरंजनाचा उत्सव ठरणार्‍या आयपीएल सामन्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी खेळाडूंच्या लिलावाची बोली लागून लवकरच हे सामने सुरू होतील. त्यासाठी विविध टीमने सरावाची तयारी करण्यास सुरुवात केली असून ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलालाही पसंती मिळत आहे. यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकता नाईट रायडर्स यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर पंजाब किक्ज टीमनेही अर्ज केला असल्याने यंदा तीन संघांचे सराव दादाजी कोंडदेव स्टेडीअमवर अपेक्षित आहेत. त्यातही रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टीम फ्लड लाईटमध्ये रात्रीच्या सरावासाठी आग्रही आहेत. बाकीच्या दोन्ही टीम दिवसा आणि रात्री सराव करण्यास तयार आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून व्यावसायिक पद्धतीने पालिकेचे क्रीडा विभाग भाडे आकारणार आहे. दिवसाच्या तीन ते चार तासांच्या नेट सरावापेक्षा रात्रीच्या फ्लड लाईटमधील चार तासांच्या सरावासाठी भाडे जास्त म्हणजे पावणे चार लाख इतके आहे. पण या महसूलावर पाणी पडते की काय अशी चिंता आता प्रशासनाला भासू लागली आहे.

वास्तविक २००० साली दादोजी कोंडदेव स्टेडीअमवर रणजी करंडक सामने झाले होते. त्यानंतर बीसीसीआयने केलेल्या अटीशर्तींमुळे येथे एकही सामना होऊ शकला नाही. याची दखल घेत मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी आवश्यक असलेले बदल करून आंतरराष्ट्रीय खेळपट्टी येथे करून घेतली. पण डे अ‍ॅण्ड नाईट क्रीकेट सामने भरवायचे असतील तर त्यासाठी विशेषता रात्रीच्या सत्रासाठी फ्लड लाईटची आवश्यकता भासणार हे निदर्शनास येताच मुख्यमंत्र्यांनी तत्काळ २० कोटींचा निधी दिला. त्यातून प्रेक्षक गॅलरीचे नुतनीकरण, फ्लड लाईटची व्यवस्था करण्यात आली. हे काम ऑक्टोबर, सप्टेंबर २०२२ साली पूर्ण झाले. यावर्षी मे महिन्यात उद्घाटन करण्याचा मानस होता. पण पाऊस लागला आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या तारखेअभावी दसरा, दिवाळीचाही मुहूर्त हुकला. तेव्हापासून फ्लड लाईट आणि नुतनीकरण केलेले स्टेडीअमचे उद्घाटन लांबत गेले.

तर हे सिझनही वाया जाणार
आयपीएलचा हंगाम सुरू होत आहे. त्यासाठी विविध टीमकडून सरावासाठी अर्ज येत आहेत. पण उद्घाटन रखडल्याने त्यांना अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सरावाला सुरुवात होईल. त्याआधी म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत उद्घाटने होणे आवश्यक आहे. अन्यथा हा सिझनही वाया गेल्यास केलेला खर्च पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता आहे.

ठाणे पालिकेच्या क्रीडा विभागाला दरवर्षी ७० ते ८० लाखांच्या उत्पन्नाचे टार्गेट दिले जाते. मात्र दादोजी कोंडदेव स्टेडीअममध्ये बसवण्यात आलेल्या फ्लड लाईट आणि नुतनीकरणामुळे येथे क्रिकेट सामने भरवून उत्पन्न वाढण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली. त्यामुळे उत्पन्नाचे उद्दिष्टही दुपटीने वाढवून दीड कोटी करण्यात आले. आयपीएल सरावातूनही हे लक्ष्य गाठणे शक्य आहे, अशी माहिती क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी दिली.