ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याची प्राथमिक रुपरेषा गुरूवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली.
अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साचणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूरसदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) ही वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था या कृती आराखड्याचे काम करत आहेत. याच संस्थेने महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता उपाययोजना कृती आराखडाही तयार केला आहे.
आपत्ती नियंत्रणात प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणारे कर्मचारी यांचे अद्ययावत प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता या दोन गोष्टींचाही उहापोह या कृती आराखड्यात करण्यात आला आहे.
नाल्यात पडणारा कचरा ही शहराची मोठी समस्या आहे. हा कचरा रोखण्यासाठी काय आणि कसे उपाय करता येतील, नागरिकांचे प्रबोधन कसे करता येईल, त्यांना कचरा टाकण्यासाठी सोयीचे कोणते पर्याय देता येतील, याचा विचार करून उपाय सुचवण्याची सूचना आयुक्त राव यांनी ‘सीईईडब्ल्यू’च्या प्रतिनिधींना केली.
सहा महिन्यांपासून या कृती आराखड्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांच्याकडून मिळालेली माहिती तसेच, आपत्ती व्यवस्थापनबाबतच्या शास्त्रीय संकल्पना आदींची सागंड घालून सीईईडब्ल्यू यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केला आहे. त्यात, पूर स्थितीस कारणीभूत घटक, त्यावरील अल्प आणि दीर्घ कालीन उपाय, त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणार उपयोग आदींबाबत मुद्द्यांचा समावेश आहे. हा प्राथमिक अहवाल आता महापालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मते आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. सीईईडब्ल्यूचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी हा अहवालाचे सादरीकरण करून त्याची प्रत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रदान केली.
याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आदी उपस्थित होते.
जखम होऊच नये याची काळजी कोण घेणार?
पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यानंतर उपाय योजना करण्यापेक्षा अशी स्थिती निर्माण होऊच नये, यासाठी प्रशासनाने वर्षभर दक्ष राहण्याची गरज आहे. दिवा आणि विटाव्यात खारफुटी गाडून अनधिकृत बांधकामे आजही सुरू आहेत. विटाव्याच्या खाडीत तर बांधकामांमुळे एके ठिकाणी बॉटल नेक निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या काळात देखील विटावा परिसरात होत असलेल्या बांधकामांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पूर सदृश्यस्थिती रुपी जखमेवर उपचार करण्यापेक्षा ही जखम होऊच नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, असे आवाहन दक्ष नागरिकांनी केले आहे.