ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील फ्लेमिंगो शिल्पाकृती राष्ट्रीय विक्रमाची मानकरी

नवी मुंबई:  नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या पामबीच मार्गानजीकच्या सेक्टर 26 नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून 28.5 फूट इतक्या उंचीची भव्यतम फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे.

या अत्यंत भव्य स्वरुपात साकार झालेल्या शिल्पाकृतीची विशेष नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणा-या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेस याबाबतचे राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स संस्थेचे परीक्षक श्री. बी. बी. नायक यांनी “टाकाऊ धातूंच्या यंत्रभागांव्दारे बनविलेले देशातील सर्वात उंच शिल्पाकृती” असा मजकूर असलेले राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र व पदक महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे प्रदान केले.

अनेक समुद्र ओलांडून नवी मुंबईत येणारे रोहीत पक्षी (फ्लेमिंगो) हे नवी मुंबईचे आकर्षण स्थान आहे. नवी मुंबईच्या खाडी किनारी वर्षातील दीर्घकाळ वास्तव्य करणारे फ्लेमिंगो पक्षी बघण्यासाठी पर्यटक, पक्षीप्रेमी व नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेने शहराची “फ्लेमिंगो सिटी” ही ओळख दृढ करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोची आकर्षक भित्तीचित्रे साकारण्यात आली असून अनेक ठिकाणी फ्लेमिंगोच्या शिल्पाकृती बसविण्यात आलेल्या आहेत.

अशाच प्रकारची 26 वेगवेगळ्या यंत्रातील 1790 टाकाऊ यंत्रभागांपासून बनविलेली धातूची फ्लेमिंगो शिल्पाकृती लांबूनही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही शिल्पाकृती 28.5 फूट अर्थात 8.70 मीटर उंचीची असून 3.9 फूट उंचीच्या चौथ-यावर बसविण्यात आलेली आहे. 1.5 टन वजनाची ही रेखीव फ्लेमिंगो शिल्पाकृती अत्यंत लक्षवेधी आहे. त्यामुळे या टाकाऊतून टिकाऊ आकर्षक फ्लेमिंगो शिल्पाकृतीस देशातील सर्वात उंच टाकाऊ धातूंच्या यंत्रभागाव्दारे बनविलेली शिल्पाकृती म्हणून बेस्ट ऑफ इंडिया या नामांकित संस्थेने राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

या राष्ट्रीय विक्रमामुळे नवी मुंबईची “फ्लेमिंगो सिटी” ही ओळख राष्ट्रीय स्तरावर मुद्रांकित झालेली असून याव्दारे नवी मुंबईच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे असे मत व्यक्त करीत बांगर यांनी या राष्ट्रीय विक्रमाबद्दल सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.