ठाण्यात गत वर्षापेक्षा यंदा पाच हजार ‘बाप्पा’ जास्त

ठाणे: यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत एक लाख ४७,१९८ घरांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत. गत वर्षाच्या तुलनेत ही संख्या पाच हजाराने जास्त आहे.
गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पहायला मिळत आहे. दीड, तीन, पाच, सात दिवसांचे घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणपतींच्या तयारीला वेग आला आहे. यावर्षी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये १०५२ सार्वजनिक तर तब्बल एक लाख ४५,१९८ घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. अनेक मोठ्या मंडळांनी बाप्पाला वाजतगाजत आणण्यास सुरुवातही केली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घरगुती गणपतींमध्य यंदा पाच हजारांची वाढ झालेली दिसते. गेल्यावर्षी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये एक लाख ४०,३६६ घरगुती गणपतींची नोंद झाली होती.
केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिकांमध्येही घरी गणपती आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये नवसाच्या गणपतींचाही समावेश आहे. यामध्ये दिड आणि पाच दिवसांच्या गणपतींची संख्या जास्त आहे. यावर्षी दिड दिवसांचे सुमारे ३९ हजार ६३६ गणपती आहेत. तर दिड दिवसांच्या गणपतीचे मनसोक्त लाड करता येत नसल्याने ३९,८६४ घरांमध्ये पाच दिवस बाप्पा पाहुणचार घेणार आहेत.