नऊ मोठ्या बिल्डरांकडून पाच हजार ग्राहकांची फसवणूक

आमदार संजय केळकर यांनी फसवणुकीविरोधात उघडली मोहीम
रेरा कडे तक्रार, अधिवेशनातही उठवणार आवाज

ठाणे : शहरातील नऊ मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी सुमारे पाच हजार ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्यांच्यामुळे ग्राहकांना नाहक बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडावे लागत असून त्यांचा विरोधात आ. संजय केळकर यांनी मोहीम उघडली आहे.
मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना सदनिकांची विक्री केली आहे, परंतु इमारतीची कामे मात्र पूर्ण केली नाहीत. काही व्यावसायिकांनी पार्किंग, तरण तलाव, उद्या, क्लब हाऊस, जिम या सुविधा देण्याचे आमिष दाखवून सदनिकांची विक्री केली आहे. या सर्व सुविधांमुळे बँकांकडून ग्राहकांनी कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत, परंतु सदनिका मात्र ताब्यात मिळत नसल्याने अनेक ठाणेकर ग्राहकांनी आ. केळकर यांच्याकडे कैफियत मांडली
होती. ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेऊन आ. केळकर यांनी त्या नऊ बिल्डरांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांचे प्रकल्प गृह प्रदर्शनात मांडण्यास आ. केळकर यांनी विरोध केल्यामुळे त्या नऊ बिल्डरांचे प्रकल्प प्रदर्शनात ठेवण्यात आलेले नाहीत. या बिल्डरांच्या विरोधात ‘रेरा’कडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्राहकांचे मेहनतीचे पैसे बुडणार नाहीत, याची काळजी घेऊन बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात मोहीम उघडणार असल्याचे आ. केळकर म्हणाले.
आगामी अधिवेशनात ठाण्यातील ग्राहकांच्या समस्या मांडणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार देखिल करण्यात आली असल्याचे आ. केळकर म्हणाले.