पाच उद्याने गिळंकृत, मलनि:स्सारण टाकीच्या जागेवरही डोळा

आरक्षित भूखंडावरून सेना-भाजपात संघर्ष

ठाणे : शिवाईनगर येथील ठाणे महापालिकेने उद्यानांसाठी आरक्षित केलेले १७,२०० मीटर क्षेत्रफळाचे पाच भूखंड राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गिळकृत केले असून म्हाडा कॉलनीतील मलनि:स्सारण टाकीच्या जागेत चक्क समाज मंदिराच्या इमारतीचा घाट घातल्याचा आरोप भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला.

श्री.राणे यांनी केलेल्या आरोपात शिवसेनेच्या आमदाराचे नाव घेतले नसले तरी स्थानिक आमदार असा उल्लेख केला असल्याने त्यांचा रोख शिवसेनेच्याच आमदाराकडे असल्याचे उघड झाले आहे. या आरक्षित जागांवर उद्याने उभारली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सीताराम राणे यांनी दिला आहे.

मुंबईलगत वेगाने वाढणाऱ्या ठाणे शहरात आबालवृद्ध नागरीकांना विरंगुळ्यासाठी उद्यानेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वर्तकनगर, उपवननजीक असलेल्या शिवाईनगर या परिसराचे एकुण क्षेत्रफळ एक लाख चौरस मीटर असुन येथील लोकसंख्या अंदाजे आठ हजारांच्या घरात आहे. मात्र, रहिवाशांना विरंगुळ्यासाठी तसेच, लहान मुलांना खेळण्या- बागडण्यासाठी एकही उद्यान उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब भाजपच्या सीताराम राणे यांनी उघडकीस आणली आहे.

म्हाडाच्या मंजूर विकास आराखड्यात शिवाईनगरमधील गणेशनगर येथे ६०८० चौ. मीटर, शिवाई विद्यालयाशेजारी प्रत्येकी आठ हजार आणि दोन हजार मीटरचे दोन भूखंड, शेळके चाळ, शिवाईनगर म्हाडा कॉलनी येथील २,७०० चौरस मीटर आणि जयभवानी सोसायटीच्या बाजुला ३६३ चौ.मीटरचा भूखंड असे एकुण पाच भुखंड मिळुन १७ हजार चौरस मिटरपेक्षा जास्त जागा उद्यानासाठी आरक्षित होती. मात्र, चलाख राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी वसवुन तसेच, समाज मंदिराच्या नावाखाली इमारती उभारण्यात येत असल्याचे सीताराम राणे यांनी सांगितले.

शिवाईनगर म्हाडा कॉलनीतील मलनि:स्सारण वाहिनीची सेप्टीक टँक असलेल्या जागेचा वापर बंद असलेल्या जागेवर देखील अनधिकृतरित्या समाज मंदिर हॉल उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. याला प्रशासनाची कोणतीही मंजुरी नसताना स्थानिक आमदाराने नुकतेच याचे भूमीपूजन केल्याने याला स्थानिक रहिवाशांनी टोकाचा विरोध दर्शवला आहे. तसेच, याविरोधात शिवाईनगरवासींनी दंड थोपटले असून या आरक्षित भुखंडावर कुठल्याही प्रकारची इमारत होऊ देणार नाही, या जागेवर उद्यान उभारले नाही तर उद्रेक होईल, असा इशारा पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या रहिवाशांनी दिला आहे.