राज्य शासनाकडून पाच कोटी महापालिकेकडे हस्तांतरीत
ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून ओवळा-माजिवडा मतदारसंघात पाच फुटबॉल प्रशिक्षण केंद्र मंजूर केले असून प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे पाच कोटी रूपये राज्य शासनाने ठाणे महापालिकेकडे वर्ग केले आहेत.
महापालिका क्षेत्रामध्ये अनेक फुटबॉल प्रेमी असून फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणासाठी योग्य मैदान व जागा उपलब्ध नसल्याने क्रिडाप्रेमींची प्रचंड कुंचबणा होत होती. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी याबाबत केलेल्या मागणीमुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मागणी केली. राज्य शासनाने पाच प्रशिक्षण केंद्रे मंजूर केली असून प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे पाच कोटी मंजूर केले आहेत.
ओवळा-माजिवडा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये लोकमान्यनगर येथील रामचंद्र ठाकुर तरण तालवाजवळ, भिमनगर येथील म्हाडा वसाहतीजवळ, पवार नगर येथील प्रबोधनकार ठाकरे मैदानामध्ये, आनंदनगरजवळील स्वामी समर्थ मैदानामध्ये, वाघबीळ येथील मैदानाच्या आरक्षित भुखंडावर करण्याचे निश्चित झालेले असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. या फुटबॉल प्रशिक्षण केंद्रामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून फुटबॉलचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून फुटबॉलच्या नियमावलीनुसार या ठिकाणी सामनेही खेळविले जाणार आहेत.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेनुसार उभारण्यात येणाऱ्या फुटबॉल टर्फला चारही बाजूंनी लोखंडी जाळी असणार असून पूर्णपणे रबरी सोलींगमुळे (टर्फ) खेळाडूंना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही. त्याचबरोबर मैदानाच्या चोहोबाजूंनी फ्लड लाईटची व्यवस्था असल्याने रात्री १० वाजेपर्यंत सुध्दा या ठिकाणी खेळाडूंना सराव करता येऊ शकेल. प्रत्येक फुटबॉल टर्फच्या ठिकाणी प्रशिक्षित प्रशिक्षकांची सोय असल्याने फुटबॉलच्या नियमावलीनुसार या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल त्यामुळे ठाणे शहरातून भविष्यामध्ये पेलेसारखे जागतिक दर्जाचे फुटबॉल खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.