कल्याण पूर्वेतील दोन तर डोंबिवलीत एका रस्त्यासाठी पाच कोटींचा

अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण होणार

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील पायाभूत विकासासह रस्ते प्रवास सुखकर करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला जातो आहे. याच टप्प्यातील ५ कोटींच्या निधीला नुकतीच नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. यामध्ये कल्याण पूर्व भागातील अंतर्गत दोन रस्त्यांचा तर डोंबिवलीतील एका रस्त्याचा समावेश आहे. या तीनही रस्त्यांच्या काँक्रिटीकरण करण्यामुळे अंतर्गत वाहतूक सुलभ होणार आहे.

दोन शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महत्वाचे असलेले रस्ते रुंद आणि प्रशस्त करण्यावर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भर दिला आहे.त्यामुळेच प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम सध्या हाती घेतले गेले आहे. महत्त्वाच्या रस्त्यासोबतच शहरांतर्गत रस्ते ही शहराच्या वाहतुकीसाठी प्रशस्त असावेत, असा खा. डॉ. शिंदे यांचा मानस आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांच्या मागणीवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी आग्रही होते. त्यासाठी नगर विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. या मागणीला एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून नगर विकास विभागाने नुकताच कल्याण लोकसभा मतदारसंघातील तीन रस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ९३ लक्ष्मी बाग मधील नितीन राज हॉटेलपासून ते नाना पावशे चौक पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी एक कोटी ३० लाख, सोनारपाडा परिसरातील एन. ई. एस. शाळा तेतन्ना पनोरमा बिल्डींग पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याकरिता एक कोटी ३० लाख आणिजाईबाई विद्यामंदिर ते जुने टपाल कार्यालय (पुना लिंक रोड) पर्यंत रस्ता काँक्रिटीकरणकरण्याच्या कामासाठी दोन कोटी ४० लाख रुपयांचा असा एकूण ५” कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामामुळे कल्याण आणि डोंबिवली शहरातील अंतर्गत वाहतुकीला फायदा होणार असून प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सहज होणार आहे. या रस्त्यांसह कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आणखी विविध रस्त्यांसाठी निधी उपलब्धकरून दिला जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक विशाल पावशे, मुकेश पाटील आणि राजाराम पावशे यांनी नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.