गौरीपाडा तलावातील मासे मृत्युमुखी

कल्याण: कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील कर्नाळादेवी तलावातील मासे मृत अवस्थेत किनारी दिसून येत असल्याने तलावाचे पाणी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील सुमारे २२७०० चौरस मीटरहून अधिक जागेत नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या गौरीपाडा तलावाच्या पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न समोर येत आहे. गतवर्षी सुमारे ८५ कासवे या तलावात मृतावस्थेत सापडल्याने प्रशासकीय यंत्रणा या वुत्तामुळे चांगल्याच कामाला लागल्या होत्या.

दोन-तीन दिवसांपासून गौरीपाडा तलावातील रो कटला आणि इतर प्रजातीचे मासे मृत्युमुखी पडून तलाव किनारी दिसत असल्याने तलावाचे पाणी प्रदूषित होते की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिकांच्या मते चार दिवसांपासून सततच्या पावसामुळे आजुबाजूच्या परिसरातील दूषित चिखलयुक्त सांडपाणी तलावात जात असल्याने तलावाच्या पाण्याचे प्रदूषण होऊन मासे मृत्युमुखी पडत असावेत.

केन्द्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत तलावाच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद होत आहे. तीन वर्षीपूर्वी तलावाच्या कठड्याचे बांधकाम, सभोवताली स्वच्छता करण्यात आली होती. परंतु निधीअभावी पुढील सुशोभीकरणाचे काम रेंगाळलेले असून तलावाचा कायापालट कधी होणार असा सवाल यानिमित्ताने उभा रहिला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गौरीपाडा तलाव सुशोभिकरण, प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे अथ कोटी ७९ लक्ष रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अमृत-२ योजनेच्या अंतर्गत सादर केला असल्याचे सांगितले.