नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी पहिली विमानसेवा सुरू होत आहे.
हे विमानतळ कार्यान्वित झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच पुणे, ठाणे, पनवेल, रायगड तसेच कोकणातील इतर भागांतील नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, पर्यटनवृद्धी आणि औद्योगिक व व्यापारी गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्गिका तसेच प्रस्तावित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे विमानतळाकडे विविध दिशांनी सहज व सुरळीत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
अत्याधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक रचना आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राला नवे परिमाण देत, देशाचे नवे प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे.
पहिल्या दिवशी एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स होणार असून इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर व स्टार एअर या कंपन्या सेवा देणार आहेत. या विमानतळावर पहिले आगमन सकाळी ८ वाजता बंगळुरु येथून येणाऱ्या 6E 460 या विमानाचे होणार आहे. तर सकाळी ८.४० वाजता 6E 882 या विमानाचे हैदराबादकडे प्रस्थान होणार आहे.