प्रदूषणामुळे पडघा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पडघा: भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या भातसा नदीची उपनदी असलेल्या कुंभेरी नदीचे प्रदूषण पुन्हा गंभीर झाले आहे. कुंभेरी नदीच्या पाण्यावर हिरवा तवंग दिसू लागल्यामुळे पडघा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी जलपर्णीमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते. अवकाळी पावसामुळे जलपर्णी वाहून गेली होती; मात्र पुन्हा एकदा प्रदूषणाने कुंभेरी नदीला घेरले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार आवाज उठवूनही प्रदूषण रोखण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, तहसील कार्यालय तसेच संबंधित यंत्रणांनी नदीपात्राची पाहणी केली असली तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
नदीपात्रातील दुर्गंधी, पाण्यातील शेवाळ आणि डासांची वाढ पाहता परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचे आरोग्य तज्ञांचे मत आहे. कुंभेरी नदी अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. भाजीपाला उत्पादन, शेती, मासेमारी तसेच आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह या नदीवर अवलंबून आहे. तसेच नदीकिनारी असलेल्या प्रसिद्ध कुंभेरेश्वर महादेव मंदिरामुळे या नदीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. दरवर्षी शिवरात्री महोत्सवासाठी हजारो भाविक येथे दर्शनसाठी येतात. पडघा ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून घाट, पथदिवे व विसर्जन व्यवस्था केली असली तरी नदीची बिकट स्थिती पाहता नागरिकांनी नदीकाठाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
नदीतील हानीकारक शैवाल वाढीमुळे सूक्ष्म पोषक वाढल्यामुळे आणि रसायनामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन पार्किन्सन, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकार, किडनी विकार यासारखे रोग होतात. सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा नियोजनाचा प्रकल्प अहवाल संबंधित विभागाकडे जमा करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. स्नेहल दोंदे यांनी दिली.
पाण्यात नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याने शेवाळाचा फैलाव होतो. यामुळे नदीतील ऑक्सिजन कमी होऊन जलचर मृत्यूमुखी पडतात. पाणी दूषित होत असून भूजल पुनर्भरणावर परिणाम होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि नदीची नियमित स्वच्छता आवश्यक आहे, आहे मत पर्यावरण तज्ञ डॉ. दिलीप काकावीपुरे यांनी मांडले.