सानिध्य एकाडे राज्यविजेता; बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण

ठाणे: अंबाजोगाई येथे झालेल्या योनेक्स-सनराईज महाराष्ट्र राज्य पुरुष व १९ वर्षांखालील मुलांची बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा सानिध्य एकाडे याने १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात शानदार कामगिरी करत राज्यविजेतेपद पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत सानिध्यने दिग्विजय कंकाल याच्याविरुद्ध अत्यंत चुरशीच्या सामन्यात २१-१७, २२-२० अशा सरळ गेममध्ये विजय मिळवला.

उपांत्य फेरीत त्याच्यासमोर अव्वल मानांकित वेदांत सिद्धेश्वर याचे आव्हान होते. पहिला गेम २१-१९ असा जिंकत सानिध्यने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्ये वेदांतने १७-२१ असा पलटवार केला. मात्र निर्णायक तिसऱ्या गेममध्ये २३-२१ असा थरारक विजय मिळवत सानिध्यने आपली जिद्द, संयम आणि सामन्यावरील पकड सिद्ध केली.

अंतिम फेरीत ठाणे जिल्ह्यातीलच त्याचा जुना प्रतिस्पर्धी वेद भोईर याच्याविरुद्ध सानिध्यने अत्यंत आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच कोर्टवरील वर्चस्व राखत त्याने २१-१३, २१-१५ असा सरळ गेममध्ये विजय मिळवून अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

संपूर्ण स्पर्धेत सानिध्य एकाडेच्या खेळातील तांत्रिक सुधारणा, रणनीतीतील परिपक्वता, फिटनेस आणि गुणांकन क्षणांतील निर्णयक्षमता ठळकपणे दिसून आली. बचावातून आक्रमणाकडे झपाट्याने जाण्याची क्षमता आणि रॅलीतील संयम यामुळे तो प्रत्येक सामन्यात अधिक प्रभावी ठरला.

या उल्लेखनीय यशाबद्दल ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे संचालक श्रीकांत वाड म्हणाले,
“सानिध्य एकाडेची ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. वाशिम जिल्ह्यातील एका छोट्या शहरातून ठाण्यात येऊन स्वतःला घडवत त्याने राज्यविजेतेपद मिळवले, हे त्याच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि तांत्रिक प्रशिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे. त्याची सातत्यपूर्ण प्रगती आगामी राष्ट्रीय पातळीवरील यशाची नांदी आहे.”